देहची माझे देवालय
महात्मा बसवण्णांनी देवाचे अस्तित्व मंदिरांत, तीर्थक्षेत्रांत नाही, तर माणसांच्या हृदयात असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी अंतरंग शुद्धीची शिकवण दिली. देवाला प्रसन्न करण्यासाठी यज्ञयाग, होमहवन, उपास-तापास, जप-तप करण्याची गरज नाही, तर अंतरंग नि बहिरंग शुद्धी झाली पाहिजे. सृष्टीच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या तत्त्वास बसवण्णांनी 'लिंग' असे संबोधले आणि त्याचे प्रतीक म्हणून करस्थळी इष्टलिंग दिले. त्याची उपासना करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थीची म्हणजे पुजारी, पुरोहिताची गरज नाही. आपले पोट भरण्यासाठी आपल्यालाच भोजन करावे लागते.

तसे भक्ती सुद्धा स्वतःच करावी. महात्मा बसवण्णांच्या या पुरोहित विरहित धर्मचिंतनाने देवालयांच्या भोवतीचे सर्व प्रकारचे शोषण, भेदाभेद संपले. अशाप्रकारे महात्मा बसवण्णांनी देवालय विरहित धर्म आणि पुजारी विरहित देवाची उपासना सांगून देहालय संस्कृतीचा पुरस्कार केला आहे.
बसवादी शरणांचे आंदोलन म्हणजे देवालय संस्कृती आणि त्यावर जगणारी बांडगुळे यांना दिलेले कडवे आव्हानच होते. देवालये ही बहुजन समाजाच्या शोषणाचे केंद्रस्थाने राहिली आहेत. प्रबोधनकार ठाकरे 'देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे' या पुस्तकात लिहितात, 'देवालय म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद पसरविणाऱ्यांचे लपण्याचे अड्डे होत.' बहुजन समाजाच्या श्रमातून आणि पैशातून निर्माण झालेल्या देवालयांत त्यांच्याच गुलामिचे आणि दारिद्र्याचे कारस्थान रचले जाते असे, हे ओळखलेल्या शरणांनी देवालय संस्कृतीला पर्यायी अशी देहालय संस्कृती अस्तित्वात आणली. शरणांनी जसा हिंसक धर्म नाकारला, तशीच देवालय संस्कृतीही नाकारली आहे.
ज्या देवालयात सर्वांना मुक्त प्रवेश नाही त्या देवालय संस्कृतीवर बसवण्णांनी बहिष्कार टाकला आणि प्रत्येकाचा देह हेच देवालय असल्याचे सांगितले. देह देवालयाचे अत्यंत मनोज्ञ वर्णन बसवण्णा आपल्या वचनात करतात, 'सधन बांधती शिवालय, देवा गरीब मी करू काय? देहची माझे देवालय, त्या देवळाचे खांब माझे पाय. मस्तक हे सुवर्ण कलश. कुडलसंगमदेवा, स्थावर पावे नाश, जंगम हे अविनाश.' अशाप्रकारे मानवी देहाचे श्रेष्ठत्व प्रतिपादन केले.
शरणांनी देहाशी संबंधित क्रिया निसर्गतः समजून त्याबद्दल गौरवभाव व्यक्त केला आहे. देह तिरस्कृत न मानता 'कायाचि कैलास' असल्याचे सांगितले. देहाला 'प्रसादकाया' म्हटले आहे. म्हणून या प्रसादकायेस तुच्छ लेखू नये. प्रसादकायेची हेळसांड करू नये. देवभक्तीच्या नावाखाली उपवास, व्रतवैकल्ये करून देहदंडन करणे शरणांनी नाकारले आहे. शरण सकलेश मादरस यांनी शरीराचे महत्त्व फार सुंदररित्या सांगितले आहे,
'शरीरामुळेच गुरु लाभला, शरीरामुळेच लिंग लाभले. शरीरामुळेच जंगमाची कृपा झाली. शरीरामुळेच प्रसाद मिळाला. शरीराने सकलेश्वर देवाची पूजा करताना उच्च साधना शक्य झाली.शरीरामुळेच गुरु लाभला म्हणजे ज्ञानप्राप्त करणे शक्य झाले. शरीरामुळेच लिंग लाभले म्हणजे परमात्म्याची कृपा संपादन करता आली. शरीरामुळेच जंगमस्वरूपी समाजाची सेवा करता आली. शरीरामुळेच प्रसाद मिळाला म्हणजेच शरीर या साधनेनेच लिंगांग-सामरस्यरूपी साध्य प्राप्त झाले.
देहालय संस्कृतीचे आचरण हे मानवी जीवन आरोग्यसंपन्न, सुखी आणि समृद्ध करणारे आहे. म्हणून देवालय संस्कृतीकडून देहालय संस्कृतीकडे आपण वळले पाहिजे. देवालयांना मिळणारी अमाप देणगी ही मानवी कल्याणासाठी वापरून देहालय संस्कृतीच्या आचरणाने खऱ्या अर्थाने मानवतेचे कल्याणकारी राज्य निर्माण करू या.
Related Articles

कल्याण क्रांती विजयोत्सव
विजयादशमीला जसे अनेक पौराणिक संदर्भ आहेत, तसेच काही ऐतिहासिक संदर्भही आहेत. परंतु, पौराणिकतेच्या झगमगाटी वैभवीकरणात इतिहासाचे संदर्भ जाणते अजाणतेपणाने नजरेआड केले जातात. असाच एक ऐतिहासिक संदर्भ दुर्लक्षित राहिला, तो म्हणजे बाराव्या शतकातील महात्मा बसवण्णांच्या कल्याण क्रांती विजयोत्सवाचा.

शिवयोगी सिध्दरामेश्वर विरचित बसव स्तोत्र त्रिविधी
महात्मा बसवण्णांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व त्यांच्या समकालीन शरणांपासून आधुनिक तत्त्वज्ञ, लोककवी, लेखक, विचारवंतांपर्यंत अनेकांनी आपल्या लेखणीतून अभिव्यक्त केले आहे. बाराव्या शतकातील समकालीन अनेक शरणांनी केलेले वर्णन अगदी वस्तुनिष्ठ दिसून येते. 'महामहिम संगनबसवण्णा मलाही गुरु, तुलाही गुरु, जगतालाच गुरु पहा, गुहेश्वर' असे अल्लमप्रभू म्हणतात. 'कामांतकासी जिंकले बसव, तव कारणे, शशिधरासी वश केले बसव, तव कृपेने' असे अक्कामहादेवी सांगतात. 'बसवण्णांच्या उदरी लिंग, जंगम, प्रसाद जन्मला,' असे चेन्नबसवण्णा म्हणतात.
