कल्याण क्रांती विजयोत्सव
विजयादशमीला जसे अनेक पौराणिक संदर्भ आहेत, तसेच काही ऐतिहासिक संदर्भही आहेत. परंतु, पौराणिकतेच्या झगमगाटी वैभवीकरणात इतिहासाचे संदर्भ जाणते अजाणतेपणाने नजरेआड केले जातात. असाच एक ऐतिहासिक संदर्भ दुर्लक्षित राहिला, तो म्हणजे बाराव्या शतकातील महात्मा बसवण्णांच्या कल्याण क्रांती विजयोत्सवाचा.

"बसवन्ना यांच्या 'अनुभव मंटप'चे एक चित्रण, जेथे सर्व जातींचे लोक एकत्र येऊन त्यांच्या हृदयाच्या जवळ असलेल्या (जिव्हाळ्याच्या) विषयांवर चर्चा आणि वादविवाद करत असत."
महात्मा बसवण्णा आणि समकालीन शरणांच्या नेतृत्वाखाली उदयास आलेल्या कल्याण क्रांतीने या देशातील अज्ञान, दुःख, दारिद्र्य, अंधश्रद्धा, जातीयता संपुष्टात आणून समताधिष्ठित समाज निर्माण केले. मानवी मांगल्याचा विचार पेरणारी ही क्रांती आजच्या महाराष्ट्रातील मंगळवेढ्यात सुरू झाली न (बसव) कल्याणमध्ये फळली, फुलली, बहरली. या क्रांतीचा कीर्ती सुगंध दशदिशांत पसरला आणि देशभरातील असंख्य शरण-शरणी (स्त्री-पुरुष) कल्याणला आले. जगातील पहिल्या लोकशाही संसदेचे प्रारूप असलेल्या अनुभव मंटपात अनुभवांचे विचार मंथन केले. त्यातून वचन साहित्यरूपी नवनीत निघाले. वचन साहित्यातील क्रांतीमूल्यांनी वैदिक परंपरेच्या विषमतावादी व्यवस्थेला पर्यायी अशी सकल जीवात्म्यांचे कल्याण साधणारी समतावादी मूल्यव्यवस्था अस्तित्वात आणली.
समता मूल्यांच्या प्रतिष्ठापणेसाठी शरणांनी केलेला संघर्ष रोमांचकारी असा आहे. कल्याण क्रांतीने दिलेल्या हादर्यांनी वैदिक व्यवस्थेची बुरुज ढासळू लागली. या क्रांतीच्या विरुद्ध त्यांनी प्रतिक्रांतीचे अनेक प्रयोग केले. पण, ते सर्व निष्फळ ठरले. शेवटी अनुभव मंटपात शरण हरळय्या यांचा मुलगा शिलवंत आणि मंत्री मधुवरस यांची मुलगी लावण्यवती यांचा विवाह झाला. वास्तविक पाहता हा लिंगायत धर्मीयांमध्ये झालेला सजातीय विवाह असताना सुद्धा त्यांच्या पूर्वाश्रमीचा, चांभार आणि ब्राह्मण यांच्यातील आंतरजातीय विवाह भासवून प्रतिक्रांतीची ठिणगी पाडली. वैदिक व्यवस्थेमध्ये खदखदत असलेला असंतोष उफाळून आला. राज्य सिंहासन धोक्यात असल्याचे भासवून बसवण्णांना हद्दपार करण्यात आले.
शरण हरळय्या आणि शरण मधुवरस यांना हत्तीच्या पायी बांधून मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. याचा जाब विचारण्यासाठी शरण समूह राजदरबाराकडे येत असताना, बिज्जलाच्या राजकीय विरोधकांनी त्याचा खून केला. आणि त्याचा आरोप मात्र शरणांवर केला गेला. परिणामी शरण आणि बिज्जलाच्या सैन्यात संघर्ष सुरू झाला. असंख्य शरणांचे हत्याकांड घडविण्यात आले. वचन साहित्य भांडारास आग लावण्यात आली. काही शरणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, बिज्जल सैन्याशी लढा देत, वचन साहित्याचे रक्षण करण्यासाठी कल्याण सोडले. सैन्याचा पाठलाग सुरू होता. शरणगण वचन साहित्य रक्षणासाठी शरण हाती घेऊन लढले. बसवकल्याण ते उळवी मागत अनेक ठिकाणी युद्धे झाली. त्या युद्धांत डोहर कक्कय्या, मडिवाळ माचिदेव, गंगांबिका, नुलीय चंदय्या, कल्याणम्मा ते शरण-शरणी धारातीर्थी पडले. शरण हरळय्या आणि शरण मधुवरस यांना ज्या दिवशी मृत्युदंडाची शिक्षा झाली, तो दिवस नवमीचा होता.
समतेच्या प्रतिष्ठापणेसाठी आमच्या शरणांनी हौतात्म्य पत्करले म्हणून आमच्या शरणांनी 'मरणवे महानवमी' म्हणून मृत्यूचा सोहळा साजरा केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे विजयादशमी दिवशी हा समतामूल्याचा विजय म्हणून 'कल्याण क्रांती विजयोत्सव' साजरा केला. शरणांच्या त्याग-बलिदानाच्या स्मरणार्थ आजही अनेक लिंगायत मठांमध्ये नऊ दिवस ' मरणवे महानवमी ' आणि ' कल्याण क्रांती विजयोत्सव ' साजरा केला जातो. शरणांच्या त्याग-बलिदानाचा वारसा जपताना कल्याण क्रांतीच्या मूल्यांचा पुनर्जागर केला पाहिजे.
Related Articles

देहची माझे देवालय
महात्मा बसवण्णांनी देवाचे अस्तित्व मंदिरांत, तीर्थक्षेत्रांत नाही, तर माणसांच्या हृदयात असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी अंतरंग शुद्धीची शिकवण दिली. देवाला प्रसन्न करण्यासाठी यज्ञयाग, होमहवन, उपास-तापास, जप-तप करण्याची गरज नाही, तर अंतरंग नि बहिरंग शुद्धी झाली पाहिजे. सृष्टीच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या तत्त्वास बसवण्णांनी 'लिंग' असे संबोधले आणि त्याचे प्रतीक म्हणून करस्थळी इष्टलिंग दिले. त्याची उपासना करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थीची म्हणजे पुजारी, पुरोहिताची गरज नाही. आपले पोट भरण्यासाठी आपल्यालाच भोजन करावे लागते.

शिवयोगी सिध्दरामेश्वर विरचित बसव स्तोत्र त्रिविधी
महात्मा बसवण्णांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व त्यांच्या समकालीन शरणांपासून आधुनिक तत्त्वज्ञ, लोककवी, लेखक, विचारवंतांपर्यंत अनेकांनी आपल्या लेखणीतून अभिव्यक्त केले आहे. बाराव्या शतकातील समकालीन अनेक शरणांनी केलेले वर्णन अगदी वस्तुनिष्ठ दिसून येते. 'महामहिम संगनबसवण्णा मलाही गुरु, तुलाही गुरु, जगतालाच गुरु पहा, गुहेश्वर' असे अल्लमप्रभू म्हणतात. 'कामांतकासी जिंकले बसव, तव कारणे, शशिधरासी वश केले बसव, तव कृपेने' असे अक्कामहादेवी सांगतात. 'बसवण्णांच्या उदरी लिंग, जंगम, प्रसाद जन्मला,' असे चेन्नबसवण्णा म्हणतात.
