शिवयोगी सिध्दरामेश्वर विरचित बसव स्तोत्र त्रिविधी

महात्मा बसवण्णांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व त्यांच्या समकालीन शरणांपासून आधुनिक तत्त्वज्ञ, लोककवी, लेखक, विचारवंतांपर्यंत अनेकांनी आपल्या लेखणीतून अभिव्यक्त केले आहे. बाराव्या शतकातील समकालीन अनेक शरणांनी केलेले वर्णन अगदी वस्तुनिष्ठ दिसून येते. 'महामहिम संगनबसवण्णा मलाही गुरु, तुलाही गुरु, जगतालाच गुरु पहा, गुहेश्वर' असे अल्लमप्रभू म्हणतात. 'कामांतकासी जिंकले बसव, तव कारणे, शशिधरासी वश केले बसव, तव कृपेने' असे अक्कामहादेवी सांगतात. 'बसवण्णांच्या उदरी लिंग, जंगम, प्रसाद जन्मला,' असे चेन्नबसवण्णा म्हणतात.

October 23, 2026 2 min read
शिवयोगी सिध्दरामेश्वर विरचित बसव स्तोत्र त्रिविधी

अक्कानागाई, नीलांबिका यांच्यासह डोहर कक्कय्या, बुरुड केतय्या, मंडिवाळ माचीदेव यांनी केलेले वर्णन रोमांचकारी आहे. विशेषतः सोलापूरच्या शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी आपल्या वचनांतून महात्मा बसवण्णांच्या महान व्यक्तित्वाचे विश्वरूप दर्शन घडविले आहे. आपले सर्वस्व ते बसवण्णास मानतात. 'बसव माझी माता, बसव माझा पिता, बसवण्णाच असे परम आप्त माझा. वसुधीश कपिलसिद्ध मल्लिकार्जुन, बसवण्णाच असे गुरु ' असे भावपूर्ण उद्गार ते काढतात. एवढेच नाही तर त्यांनी स्वतंत्रपणे 'बसव स्तोत्र त्रिविधी'ची रचना केली आहे. 'त्रिविधी' एक कन्नड काव्यप्रकार आहे. शिवयोगी सिद्धरामेशांनी 'योगीनाथ' या अंकिताने ७०० त्रिविधींची रचना केली असून, त्यात बसव स्तोत्र त्रिविधी, मिश्रस्तोत्र त्रिविधी आणि अष्टावर त्रिविधी यांचा समावेश होतो. 'बसव स्तोत्र त्रिविधी' ही बसवण्णांचे दर्शन घडविणारी एक अपूर्व कृती म्हणून ओळखली जाते. याचा मराठी अनुवाद डॉ. जयदेवीताई लिगाडे यांनी केला असून, त्यात पथदर्शनेही पद्यरचनेची गेयता दिसून येते.

शिवयोगी सिद्धरामेशांनी बसवण्णांचे वर्णन करताना बसव, बसवरस, बसवलिंग, बसवप्पा, बसवेश, बसवय्या, बसवण्णा, बसवानंद, बसवप्रभू अशी अत्यंत लाडिवाळ भाषा वापरली आहे. 'हे बसवेशा ! हे बसवराज ! हे बसवण्णा, बसवपिता, बसवकृपानिधी !! बसव परमेश्वरीश्वर ! बसव प्रमथादिदेव रक्षिसु बसव !! या स्तुतीने आरंभ झालेल्या बसव स्तोत्र त्रिविधीमध्ये एकूण १२६ त्रिपदी समाविष्ट आहेत.

'प्रथमंतु बसवण्णा ! द्वितीयंतु लिंग हा ! तृतीयंतु तत्त्व ब्रह्मांड सारे! अकलंक गुणनिधी चिदानंद बसवाचा ! भक्त झालो गुरु योगिनाथ !!' बसवचि सत्यांग ! बसवचि नित्यांग ! बसव परम चित् स्वरूप असे ! बसव अनादि लिंग, बसव अनादि गुरु ! बसवविन अधिक कोण योगिनाथ !!' असे रसाळ वर्णन आढळते.

बसव केवळ एक व्यक्ती नसून, एक तत्त्व असल्याचे सांगत सिद्धरामेशांनी बसवण्णास गुरु, लिंग, जंगम आणि तत्त्व ब्रह्मांड स्वरूप असल्याचे सांगितले आहे. बसव परब्रह्म स्वरूप आहे. बसव सत्य, नित्य, भक्तिरूप, चित् स्वरूप आहे. बसव आदि, अनादि गुरु आहे. बसव सकल, निष्कलासी गुरु आहे. बसव नाद, बिंदु कलातीत आहे. बसव भक्ती-मुक्तीचे बीज आहे. बसव भवदु:खहारक आहे. बसव लिंग-जंगम, अंगलिंगाचे प्रकाश एकत्व दाखविणारा आहे. बसव कालहर, कालांतक, चित्तहारी आहे. बसव अंग-लिंग षट्स्थल भरीत आहे. बसव मरणरहित, शरण शाश्वत आहे. बसव करुणासागर आहे, बसव आशा-पाशरहित आहे. बसव काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर विरहित आहे.

शेवटी 'असे बसव स्तवन ! सदा सर्वदा स्फुरुन ! निश्चिंत जाहलो सुखे भरांत ! सच्चिदानंद गुरु बसव बोधामृतात ! पावे मन एकता मम योगिनाथ !!' असे हृदयस्पर्शी वर्णन शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी केले आहे. या त्रिपदीमधून शिवयोगी सिद्धरामेश्वरांची बसवेश्वरांवरील प्राणाधिक अशी निस्सीम भक्ती आणि प्रेम व्यक्त झाले आहे.

लिंगायत धर्माचा आत्मा म्हणजे इष्टलिंग होय. या इष्टलिंगाचे जनक बसवण्णा असून प्राणलिंग, भावलिंगही त्यांना बसवण्णांच्याच ठायी दिसतात. बसव या त्रयअक्षराने त्रिविधमलाचा नाश होऊन मी नित्यसुखी झालो असून माझ्या अंगलिंगगात तूच सामावून उरला आहेस. तू आणि मी एकजीव झालो आहोत. षड्अंगातील षडि्ंलग तूच झाला आहेस अशा भक्तीभावाने शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी महात्मा बसवण्णांचे स्तवन केले आहे. यावरून शिवयोगी सिद्धरामेश्वरांची बसवण्णांप्रती असलेली भक्ती अभिव्यक्त झाली आहे.

Related Articles

देहची माझे देवालय
Culture

देहची माझे देवालय

महात्मा बसवण्णांनी देवाचे अस्तित्व मंदिरांत, तीर्थक्षेत्रांत नाही, तर माणसांच्या हृदयात असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी अंतरंग शुद्धीची शिकवण दिली. देवाला प्रसन्न करण्यासाठी यज्ञयाग, होमहवन, उपास-तापास, जप-तप करण्याची गरज नाही, तर अंतरंग नि बहिरंग शुद्धी झाली पाहिजे. सृष्टीच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या तत्त्वास बसवण्णांनी 'लिंग' असे संबोधले आणि त्याचे प्रतीक म्हणून करस्थळी इष्टलिंग दिले. त्याची उपासना करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थीची म्हणजे पुजारी, पुरोहिताची गरज नाही. आपले पोट भरण्यासाठी आपल्यालाच भोजन करावे लागते.

Oct 31, 2026·2 min
कल्याण क्रांती विजयोत्सव
Culture

कल्याण क्रांती विजयोत्सव

विजयादशमीला जसे अनेक पौराणिक संदर्भ आहेत, तसेच काही ऐतिहासिक संदर्भही आहेत. परंतु, पौराणिकतेच्या झगमगाटी वैभवीकरणात इतिहासाचे संदर्भ जाणते अजाणतेपणाने नजरेआड केले जातात. असाच एक ऐतिहासिक संदर्भ दुर्लक्षित राहिला, तो म्हणजे बाराव्या शतकातील महात्मा बसवण्णांच्या कल्याण क्रांती विजयोत्सवाचा.

Oct 23, 2026·2 min